
२०२० ते २०३० हे दशक एक क्रांतिकारी दशक असणार आहे यात काही शंका नाही कारण तंत्रज्ञान ज्या गतीने आपल्या आयुष्यात शिरकाव करीत आहे ते पाहता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणात कुठल्यातरी तंत्रज्ञानावर आधारित वस्तूंची मदत घेत घेतच आपण आपली रोजची कामे आता करू लागलो आहोत. अन्न वस्त्र निवारा या पंचमहाभौतिक गोष्टी आपल्या मुलभूत गरजा असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी खटपट कमी करण्या साठी तंत्रज्ञानावर आधारित गोष्टींचा आधार घेण्यावाषून आपल्याला पर्याय राहिलेला नाही. पण प्रत्येक गोष्टीला जशा दोन्ही बाजू असतात तशा या जीवन शैलीला सुद्धा आहेत. आणि ती दुसरी बाजू म्हणजे जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या मणक्यांचे सांध्यांचे आजारात झालेली वाढ. आजच्या घडीला गुडघे , मान पाठ खांदा दुखीचे पेशंट नाहीत असे घर शोधून सापडणार नाही. इतके दिवस केवर हृदयरोग किंवा मधुमेह यालाच जीवनशैलीचे आजार असं संबोधलं जायचं पण त्यात आता सायटिका स्लीप डिस्क osteoarthritis, फ्रोजन शोल्डर या आजारांची सुद्धा भर पडली आहे हे नक्की. या गोष्टी थोड्या मुळातून समजून घेण्याची गरज आहे.
मुळात सांध्याची झीज होणे हा आजार नाही. हो तुम्ही बरोबर वाचत आहात. सांध्यांची झीज होणे हा आजार नाही तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि ती झीज होण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. आपण दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी करतो त्या गुरुत्वाकर्षण बळाच्या विरुद्ध करीत असतो. गुरुत्वाकर्षण आपल्याला खाली खेचत असतं आणि त्याच्या विरुद्ध आपण आपली रोजची कामे करीत असतो. आणि हे करण्यासाठी कोणाला तरी शरीरात झिजावं लागतं. ती झीज सांध्याची होते. अगदीच अचूकतेने बोलायचं झालं तर सांध्यामध्ये असण्याऱ्या गादीची होते. मग सांध्याच्या होणाऱ्या झीज प्रक्रियेला आजार का म्हणावं लागतं ? तर जी झीज तुमच्या साठीमध्ये अपेक्षित आहे ती झीज जर चाळीशीमध्ये दिसू लागली तर मात्र त्याला आजार म्हणावं लागतं. ही वेळेच्या आधीच होणारी सांध्यांची झीज व्यक्तीची कार्यक्षमता खूप कमी करते आणि म्हणून या वेळेच्या आधी , जलद गतीने होणाऱ्या झीजीला मात्र वैद्यकीय दृष्टीकोनातून बघावं लागतं.
हे आजार इतक्या जास्त प्रमाणात सध्या दिसण्याची अनेक कारण आहेत. मागच्या ५० वर्षात आपल्या पायाखाली सिमेंट कॉंक्रीट वाढत चाललं आहे. त्यामुळे मानवी वजन, जे आधी नैसर्गिक मातीवर प्रसारित होत होतं (Weight Distribution) ते आता concrete वर किंवा टणक अशा Vitrified Tiles पडत किंवा आणि त्यातून येणारी प्रतिक्रिया ( normal reaction ) अतिशय शार्प असते. दुसरं कारण म्हणजे आपल्या बदलेल्या सवयी. आधी प्रत्येक गोष्टीसाठी आपण बाहेर जाउन , ४ पावलं चालून ती गोष्ट करायचो ( किराणा आणणे , भाजी आणणे , दूध आणणे वगैरे ). आता दुकानच तुमच्या घरी येतं आणि तेही १० मिनिटात. ५ रुपयाचे खरे शेंगदाणे आणायला सुद्धा आपल्याला सोफ्यावरून उठावं लागत नाही आणि यालाच सुबत्तेचं प्रतिक म्हणून दाखवणाऱ्या कंपन्याचे पेव फुटलं आहे. तिसरं म्हणजे वाढलेला ताण (stress). ताण तणाव असेल तर सांध्याची होणारी झीज ही जलद गतीने होते. या सर्वांचा परिणाम आपल्या वजनावर होतो. अगदी लहान मुलांपासून आता स्थूलता ( Obesity) हा आजार सुरु झाला आहे. या सर्वांचं ओझं अव्याहतपणे वाहणारे सांधे मग ते पाठीचे असोत, गूढघ्याचे, मानेचे असोत कि खांद्याचे ते माणसाची साथ लवकर सोडत आहेत. आणि म्हणूनच दर वर्षी २००० कोटींची उलाढाल असणारे गूढघ्यांच्या TKR शस्त्रक्रियेचे (Total Knee Replacement) मार्केट भारतात तयार झाले. त्यात सायटिका , स्लीप डिस्क ( मणक्यातील गादी बाहेर येणे ) यावरील होणाऱ्या शस्त्रक्रिया जोडल्या तर आकडा ५००० कोटींच्या घरात जातो.
शस्त्रक्रिया वाईट नाही किंबहुना काही ठिकाणी ती वरदानच आहे , कधी कधी त्याशिवाय पर्याय नसतो. पण ती सरसकटपणे सर्वच केस मध्ये वापरण्याची गोष्ट नाही. किंवा ती केली की घोडं गंगेत न्हालं आणि तुम्ही दुखण्यातून मुक्त व्हाल असं जे काही दाखवलं जातं तेही खरं नाही. पण “सर्जरी करण्याशिवाय पर्याय नाही” अशी अवस्था येण्याआधी आपले शरीर आपल्याला एक संधी नक्कीच देत असते. आणि या संधीचे सोनं करणे म्हणजेच Conservative management of musculoskeletal disease. कोणत्याही आजारावर ( बहुतांश) conservative ( म्हणजे संयमितपणे ) किंवा Aggressive उपचार पद्धती आखली जाऊ शकते. सांध्याच्या रोगावर Aggressive उपचार म्हणजे सरळ उठून शस्त्रक्रिया करणे. पण यावर संयमितपणे, झालेला आजार समजून घेऊन पारंपारिक पद्धतींचा वापर करून शरीराला स्वतः काही गोष्टी दुरुस्त करण्याची एक संधी देऊन आपण शस्त्रक्रिया टळण्याची शक्यता खूप वाढवू शकतो. गरज असते ती शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेल्या , केवळ दृश्य symptoms वर काम न करता शरीरात झालेल्या ज्या बदलामुळे आजार निर्माण झाला आहे त्यांना Reverse करण्याची एक शिस्तबद्ध उपचार पद्धतीची. अशीच एक पद्धत आहेजिचे नाव आहे रोप आणि बेल्ट थेरेपी. ही थेरेपी पारंपारिक योग विज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्राची शरीर रचना शास्त्राची समज यांचा सुरेख संगम आहे. लेखमालेतील पुढील लेखात या थेरेपी बद्दल आपण विस्तृत पणे जाणून घेणार आहोत ..
|| आरोग्यम धनसंपदा ||
मनोज देशमुख , CEO , सिनर्जी मेडिकल योगा , चिंचवड पुणे ,
७३८७०८७०८१ / manoj@synergymedicalyoga.com